आजीबाईचा बटवा

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||

No comments:

Post a Comment