*॥ चाळीतला पाऊस ॥*

चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा

छप्परावर आदळून तो किती जोराने
पडतोय याचा अंदाज यायचा
दाराला प्लॅसटीक लावून ओघळणा-या
पावळांना अडवण्यात आनंद मिळायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

शाळेची तयारी करताना तो नसायचा
घरातून बाहेर पडला की नेमका हजर व्हायचा
दप्तर भिजवायचा... पुस्तकांना भिजवून स्टोव्हवरील भांड्यावर त्यांना उतानी पाडायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

वारा आला की टिव्हीवरील दूरदर्शनच्या
कार्यक्रमांना फुल स्टाॅप दयायचा
मग बाप माझा खांद्यांवर घेऊन मला
अॅटींना हलवायला सांगायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

मग कुठून तरी तो टिपटिप
करून घरात गळायचा
त्या खाली एखादं भांड ठेवून
त्यातच त्याला साचवायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

गटारातल पाणी वाढवून
तो मोरीत शिरायचा
आईची चीडचीड सुरू झाली
की निमूटपणे मागे परतायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

गांडूळ ही जमिनीतून
घराच्या कोप-यात शिरायचा
मग मीठ टाकून त्याच्या
अंगावरील वेदना अनुभवायच्या
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

साचलेल्या चिखलात
तो पोरांना लोळवायचा
हातात शीग घेऊन मातीत
खूपसून खेळायला लावायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

उकिरड्याचा त्रास व्हायचा
पण तरीही पाऊस हवाहवासा वाटायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा...

No comments:

Post a Comment